
मुंबई : उच्च प्रतीच्या चरस तस्करीप्रकरणी तीन आरोपींना वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी वडाळा आणि शिवडी परिसरातून अटक केली. शहानवाज शाबीर गफुर राजपूत, शरीफ शकील शेख आणि शोएब साबीर गफुर राजपूत अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी १ कोटी ४३ लाख रुपयांचे ४ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे.
वडाळा परिसरात गस्त घालताना काही आरोपी चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून शहानवाज राजपूत आणि शरीफ शेख या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना उच्च प्रतीचा चरसचा साठा सापडला. पोलिसांनी सुमारे पावणेपाच किलोचा उच्च प्रतीचा चरसचा साठा तसेच तीन मोबाईल जप्त केला असून त्याची किंमत १ कोटी ४३ लाख १९ हजार रुपये इतकी आहे. या तिघांविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना अटक करुन गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.