
मुंबई : विविध टास्क देऊन एका महिलेची दहा लाखांची फसवणूक करणाऱ्या अशोक देवीदास कसबे या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कांदिवली येथे तक्रारदार महिला तिच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहे. ऑक्टोबर महिन्यांत तिला एक मॅसेज आला होता. त्यात तिला पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन विविध हॉटेलला फाईव्ह स्टार रेटींग देण्याचे टास्क देण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. प्रत्येक टास्कसाठी तिला दिडशे रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने त्यास होकार दिला होता. त्यानंतर तिला काही टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात ठराविक रक्कम कमिशन म्हणून पाठविण्यात आली होती. टास्क पूर्ण केल्यानंतर पैसे जमा होत असल्याने तिला तिच्यावर विश्वास बसला होता. या टास्कद्वारे तिला जास्त कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे तिने विविध टास्कसाठी सुमारे दहा लाखांची गुंतवणूक केली होती.