
मुंबई : टास्कच्या नावाने एका तरुणीची सुमारे सव्वासहा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ३८ वर्षांची तक्रारदार तरुणी विक्रोळीतील एका खासगी कंपनीत कामाला आहे. गेल्या आठवड्यात तिला एका खासगी कंपनीकडून नोकरीची ऑफर आली होती. होकार दिल्यानंतर तिला इंटाग्रामवरून तीन लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत तिने ६ लाख ३० हजार रुपयांचे विविध पेड टास्क पूर्ण केले होते. मात्र तिला ही रक्कम काढता येत नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी तिला तिचे पैसे दिले नाही. तसेच नंतर तिला ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला.