मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन किर्तीकरांच्या भेटीला

लोकसभेतील शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार आता शिंदे गटाकडे आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन किर्तीकरांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या अनपेक्षित भेटीची गुरूवारी दिवसभर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होती. लोकसभेतील शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार आता शिंदे गटाकडे आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्‍याने तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी पाठींबा दिला आहे. मात्र, या १२ खासदारांमध्ये किर्तीकर यांचा समावेश नाही. किर्तीकर हे शिवसेनेसोबत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी किर्तीकर यांची भेट घेतल्याने या भेटीचा वेगळा अर्थ लावला जात आहे.

गेल्या आठवड्यात किर्तीकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याने रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर तीन आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी किर्तीकर यांना दिला होता. ही शस्त्रक्रिया होऊन नुकतेच त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आल्याचे समजताच एकनाथ शिंदे त्यांनी स्वतः आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन राजकीय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय व्हा, अशा शुभेच्छा शिंदे यांनी किर्तीकर यांना दिल्या. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in