मुंबई : मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळवून देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे सरकारच करेल, असा ठाम विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोमवारी व्यक्त केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, याबद्दल शंका नाही. जेव्हा आपण विशिष्ट हेतूने सरकारवर दोषारोप करतो त्यावेळेला शंकाकुशंका निर्माण होतात. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे, अशाच प्रकारची सार्वत्रिक भुमिका समाजाची आहे.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये ही सरकारची भुमिका आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन यावर एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आहे. मराठा समाजात मतभेद असतील पण मनभेद नाहीत. त्यामुळे कुणीही मराठा समाजाच्या हिताची भूमिका घेताना आडवे येणार नाही. परंतु राजकीय भुमिका कुणी घेता कामा नये. आपल्याला कोणीतरी चालवतेय अशा प्रकारची शंका समाजाला येता कामा नये. आम्ही सर्व जरांगे यांच्यासोबत आहोत. मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. टिकलेले आहे. सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही. त्याबाबत क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल झाली आहे. त्यावर सरकार मार्ग शोधत आहे. निश्चितपणे मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाम विश्वास आहे. आरक्षण मिळाले, तर एकनाथ शिंदे आणि हेच सरकार देईल, असे पुन्हा एकदा दरेकर यांनी अधोरेखित केले.
संजय राऊत याचा दरेकरांनी घेतला समाचार
तसेच संजय राऊत यांचाही दरेकर यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे संधीसाधू वक्तव्य करताहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात आरक्षणासंदर्भात काय केलात? ते सांगत नाहीत. उलट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मराठा समाजाच्या नेत्यांना डावलण्याचे काम केले. त्यामुळे मराठा समाजाप्रती काय प्रेम आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम आहेत. त्यांना समाजाची कुठलीही दिशाभूल करायची नाही. संविधानाच्या आधारे टिकणारे आरक्षण त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठा आरक्षणाविषयी भूमिकेवर कोणी संशय घेऊच शकत नसल्याचेही दरेकर म्हणाले.