मुंबई : वांद्रे (पूर्व) येथे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल बांधण्यात येणार असून मुंबई उच्च न्यायालयाची नवीन इमारत ही कॅफेटेरिया, बहुमजली पार्किंग, ग्रंथालय अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल.
वांद्रे येथील प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश व नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर, वकील चेंबर, ग्रंथालय याबरोबरच बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा असतील. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा इमारतीत असतील.
सरन्यायाधीश डॉ. धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण सोमवारी केले जाणार आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती. ए. एस. ओक, न्यायमूर्ती दीपकर दत्ता, न्यायमूर्ती उज्वल भयान, न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालय हे मुंबईतील प्रमुख खंडपीठासह नागपूर आणि औरंगाबाद तसेच गोवा येथील खंडपीठांद्वारे कार्यरत आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेशदेखील मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारित येतात. न्यायालयात ९४ न्यायाधीशांची मंजूर संख्या असून सध्या ६६ न्यायाधीश आहेत. १६ ऑगस्ट १८६२ रोजी स्थापन झालेल्या न्यायालयाची इमारत मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे नोव्हेंबर १८७८ मध्ये बांधण्यात आली.
नव्या वास्तूसाठी ३० एकर जागा
वास्तूसाठी ३०.१६ एकर जमिनीचा ताबा टप्प्या-टप्प्याने उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला जाणार असून ४.३९ एकरचा पहिला टप्पा यापूर्वीच हस्तांतरित करण्यात आला आहे. नव्या वास्तूत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असतील.