क्लीन-अप मार्शलचा प्रदूषणावर ‘वॉच’ प्रत्येक वॉर्डात ३० टीमची गस्त

‘क्लीन-अप मार्शल’कडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाणार आहे.
क्लीन-अप मार्शलचा प्रदूषणावर ‘वॉच’ प्रत्येक वॉर्डात ३० टीमची गस्त

मुंबई : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी आता क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार असून राडारोडा, कचरा फेकणारे, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर क्लीन-अप मार्शलचा वॉच असणार आहे. प्रत्येक वॉर्डात ३० प्रमाणे ७२० क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोनाला रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले होते. मात्र कोरोना काळात तोंडावर मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. अखेर तोंडावर मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र क्लीन-अप मार्शलविरोधात तक्रारी वाढू लागल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. मात्र मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसला असून बांधकाम ठिकाणी धुळीचे कण पसरणे, रस्त्यावर कचरा फेकणे, राडारोडा फेकणे यामुळे प्रदूषणास धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेता प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा एकदा क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे.

‘क्लीन-अप मार्शल’कडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. यामध्ये आकारलेल्या दंडाची अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला तर अर्धी रक्कम पालिकेला मिळणार असल्याने महसूलही मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in