३१ मे पूर्वी नलेसफाईचे टार्गेट पूर्ण करा, पालिकेच्या संबंधितांना आदेश

मुंबईत सुरू असलेली रस्ते कामे, नाल्यातील गाळ उपसा करणे, पुलांच्या कामांचा पी वेलरासू गुरुवारी ऑनफील्ड आढावा घेतला
३१ मे पूर्वी नलेसफाईचे टार्गेट पूर्ण करा,  पालिकेच्या संबंधितांना आदेश

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी ३१ मे पूर्वी १०० टक्के नालेसफाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करा, असे आदेश पालिकेच्या संबंधितांना दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत सुरू असलेली रस्ते कामे, नाल्यातील गाळ उपसा करणे, पुलांच्या कामांचा पी वेलरासू गुरुवारी ऑनफील्ड आढावा घेतला. यावेळी उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) एम. एम. पटेल, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मोठे नाले, द्रुतगती महामार्ग आणि मिठी नदी याठिकाणी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून नाल्यातून गाळ काढण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. यंदा या सर्व कामांची सुरुवात ६ मार्चपासून झाली आहे. छोट्या नाल्यातून गाळ काढण्याची कामे विभागीय स्तरावर सुरू आहेत. पावसाळा पूर्व गाळ उपसण्याचे ३६.८० टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई शहरात ४६.३२ टक्के, पूर्व उपनगरात ५६.४९ टक्के, पश्चिम उपनगरात ४४.६१ टक्के, मिठी नदीच्या ठिकाणी २६.७० टक्के, द्रुतगती महामार्गावर १९.२१ टक्के तर विभागीय स्तरावर छोट्या नाल्याच्या ठिकाणी ३३.३६ टक्के इतकी कामे पूर्ण झाली आहेत. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामामध्ये आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ३०४.५८ मेट्रिक टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व नाल्यातून गाळ काढण्याची कामे दिनांक ३१ मे पूर्वी १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही समस्या किंवा अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिन्या यासह सर्व संबंधित खात्यांना पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. त्यानुसार कामांची योग्य आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी होते आहे किंवा कसे, याची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी पश्चिम उपनगरात हा दौरा केला.

पश्चिम उपनगरातील, आर उत्तर विभागात दहिसर नदी पूल, रुस्तमजी रस्ता, आर मध्य विभागात राजेंद्र नगर पूल, सुमेर नगर रस्ता, लिंक रोडवरील राजेंद्र नगर नाला, आर दक्षिण विभागात लिंक रोड व एम. जी. रोड जंक्शन, लालजी पाडा पोईसर नदी पूल, त्याचप्रमाणे पी उत्तर विभागात रामचंद्र नाला, पी दक्षिण विभागात राममंदीर मार्गावर वालभट नदी येथे वेलरासू यांनी पाहणी करुन निर्देश दिले. तसेच, के पश्चिम विभागात ओशिवरा नदी, लिंक रोड, मोगरा नाला, लल्लूभाई पार्क मार्ग याठिकाणीही दौरा करण्यात आला. करण्यात येत असलेली कामे व्यवस्थित असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in