मंडप बांधणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक; मुंबई महापालिकेचा इशारा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल
मंडप बांधणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक; मुंबई महापालिकेचा इशारा

अवघ्या काही दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार असून, बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे; मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मंडप उभारताना मंडपाची उंची ३० फुटांपर्यंत असावी. पावसाचे दिवस असून सोसायट्याचा वारा, मुसळधार पावसामुळे पडझडीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंडप उंची २५ फुटांपेक्षा जास्त असल्यास मंडपबांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणे गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असेल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली. दरम्यान, मंडप परिसरातील रस्त्यांवर खड्डे आढळल्यास संबंधित मंडळाला प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे अनुज्ञापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मंडप परिसरात पालिकेने तयार केलेल्या लोकोपयोगी भित्तीपत्रके, कापडी फलक प्रदर्शित करता येईल, असेही ते म्हणाले. मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्लू साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, मंडप परिसर स्वच्छ ठेवणे ही मंडळाची जबाबदारी आहे.

आवाजाच्या पातळीचे निकष पाळा

आवाजाची पातळी अधिक होणार नाही, याची काळजी संबंधित अर्जदाराने घेणे गरजेचे आहे. मंडपासाठी परवानगी दिली त्या ठिकाणी अन्य कुठल्या गोष्टी करण्यास सक्त मनाई असल्याचे त्यांनी सांगितले. मंडपाच्या अंतर्गत भागात कुठल्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाही.

वाहन व पादचाऱ्यांसाठी जागा राखीव!

रेल्वे स्टेशन, बसस्थानक, रिक्षा व टॅक्सी थांबे या ठिकाणी पादचारी व वाहनधारकांची ये-जा होत असते. त्यामुळे या ठिकाणी मंडप उभारताना वाहने व पादचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in