
"पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पराभव झाला नाही तर लोकशाहीची अंत्ययात्रा निघेल" अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच, त्यांनी 'मोदींचा पराभव कार्याचा असेल तर सर्व विरोधकांना एकत्र यावे लागेल,' असा सल्लादेखील दिला आहे. औरंगाबादमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला.
ते म्हणाले की, "लोकसभा निवडणूक २०२४मध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव नाही झाला, तर पुढच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीने होणार नाहीत. ते जिंकले तर लोकशाहीची अंत्ययात्रा निघेल. लोकसभेत नरेंद्र मोदी यांना पराभूत करायचे असेल, तर देशामधल्या ३८ पक्षांना एकत्र येऊन लढावे लागेल. भाजपला देशात मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही ३५ टक्के आहे. त्यांच्या विरोधातल्या मतदानाची टक्केवारी ही ६५ टक्के आहे. मतदान ३८ पक्षांमध्ये विभागले गेलेले असून या सर्वांनी एकत्र येऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढावे लागेल," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.