HSC Exam : बारावीच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोनदा घेण्यावर विचार

कोरोना काळात सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा प्रयोग सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने राबवला आहे
HSC Exam : बारावीच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोनदा घेण्यावर विचार

पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे बारावीच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोनदा घेण्यावर विचार सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंद तयार करणाऱ्या तज्ज्ञांनी बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा विचार मांडला आहे. याशिवाय बारावी बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स शाखेच्या विषयांची मिश्र निवड करता येईल, असाही विचार शैक्षणिक आकृतीबंद तयार करणाऱ्या तज्ज्ञ समितीने मांडला आहे. समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय झाल्यास बारावी बोर्ड परीक्षा नेमक्या कशा होतील, याबाबत विद्यार्थी, पालकांसोबतच शिक्षकांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे.

आयसीएसई, सीबीएसई, केंद्रीय विद्यालय किंवा प्रत्येक राज्याच्या स्टेट बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्याचा विचार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (राष्ट्रीय शैक्षणिक आकृतीबंध) तयार करणाऱ्या देशातील तज्ज्ञ मंडळींनी मांडला आहे. या आकृतीबंधानुसार सेमिस्टर पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून एकदाच किंवा दोन वेळेस घेण्यात येतील. शिवाय विद्यार्थ्यांना शाखांच्या सीमा ओलांडून विषयांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असेल. एखादा विद्यार्थी आर्टस‌्, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही विद्या शाखांमधील विषय निवडून बारावीची परीक्षा देऊ शकेल. हा आकृतीबंध शासनाच्या पातळीवर स्विकारला गेल्यास अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमाच्या रचनेत आणि पाठ्यपुस्तकांमध्येही बदल केला जाईल.

याआधी कोरोना काळात सेमिस्टर पद्धतीने वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा प्रयोग सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने राबवला आहे. भविष्यात अशाच प्रकारचे धोरण तयार करायचे झाल्यास त्यासाठी नवा आकृतीबंध तयार करताना शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यामुळे तज्ज्ञांकडून बनवल्या जाणाऱ्या या आकृतीबंधाचा स्वीकार कसा केला जाणार आणि देशातील विविध राज्य सरकारे त्याचा स्वीकार कसा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in