दूषित पाण्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्य समस्या वाढल्या

महापालिकेकडे वर्षभरात तब्बल ११ हजार तक्रारी : अंधेरीचे पाणी सर्वात दूषित
दूषित पाण्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्य समस्या वाढल्या

स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून होत असला, तरी मुंबईकर आजही दूषित पाण्यामुळे हैराण आहेत. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वर्षभरात दूषित पाण्याच्या तब्बल १०,८२९ तक्रारींचा पाऊसच पडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, वर्षभरात दूषित पाण्याच्या ११ हजार तक्रारी आल्याने मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

करदात्या मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करणे, मुंबई महापालिकेचे कर्तव्य आहे. मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणातून रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र रोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दूषित पाणी येण्याची समस्या मोठी आहे. दूषित पाणी येत असल्याची ओरड यापूर्वी पालिका सभागृह व स्थायी समितीत माजी नगरसेवकांनी केली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या आरोपानंतर पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून नेहमीच करण्यात येते; मात्र दूषित पाण्याची समस्या रोखण्यात अद्याप जल विभागाला यश आलेले नाही, हे पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

पाणीगळती रोखत मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचा जलविभाग कोट्यवधी रुपये खर्च करतो. तरीही दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे सतत येत असतात. गेल्या वर्षभरात १०,८२९ दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १०,३१० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ५१९ तक्रारींचे निवारण करण्यात येत असल्याचे जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.