चौथ्या लाटेत उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा शिरकाव

 चौथ्या लाटेत उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा शिरकाव

२०२०मध्ये उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा शिरकाव झाला, तसाच शिरकाव पुन्हा एकदा चौथ्या लाटेने उच्चभ्रू वस्तीत केला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक उच्चभ्रू वस्तीत असून अंधेरी, ग्रँटरोड, वांद्रे कोरोनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे मुंबई महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, अंधेरी पश्चिम येथे ५८४, ग्रँटरोड येथे ३९७ व वांद्रे पश्चिम येथे ३४६ सक्रिय रुग्ण आहेत.

मार्च २०२०मध्ये पहिली, ऑगस्ट २०२०मध्ये दुसरी, तर डिसेंबर २०२१मध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली होती. तिन्ही लाटा धडकल्या, त्यावेळी उच्चभ्रू वस्तीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने झाला होता; मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या योग्य उपचार पद्धतीमुळे तिसरी लाट एप्रिल २०२२मध्ये थोपविण्यात यश आले आहे; मात्र चौथ्या लाटेने मुंबईत डोके वर काढले असून, उच्चभ्रू वस्त्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. अंधेरी पश्चिम येथे सक्रिय रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. अंधेरी पश्चिम परिसरात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झाली आहे. कोरोना आल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी तब्बल ९१ हजार २५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १,०४० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर के/पूर्व अंधेरी पूर्वमध्ये ६८ हजार ४४२ बाधित आढळले असून, या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे ,१५७५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ‘डी’ विभाग ग्रँटरोड परिसरात आतापर्यंत ४९ हजार ९२० रुग आढळले असून, या ठिकाणी ८०२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर वांद्रे पश्चिम भागात आतापर्यंत ५० हजार ९७९ कोरोनाबाधित आढळले असून, ६४३ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

दुपटीचा वेग झपाट्याने घसरला

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही झपाट्याने कमी होत आहे. २० मे रोजी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल चार हजार ४३३ दिवस होता. यामध्ये मोठी घट होऊन सध्या रुग्णदुपटीचा कालावधी १,२०४ दिवसांवर आला आहे.

सध्या सर्वाधिक रुग्ण असलेल्या अंधेरी पूर्वमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी १,५२६ दिवस, अंधेरी पश्चिममध्ये ७८६ दिवस आहे. तर ग्रँटरोडमध्ये ७३१ दिवस आणि वांद्रे पश्चिममध्ये सर्वात कमी म्हणजे ६४८ दिवसांवर रुग्ण दुप्पट खाली आली आहे.

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड

: आतापर्यंत आढळलेले कोरोनाबाधित - १०,६८,८९७

: कोरोनावर मात केलेल्यांची संख्या - १०,४५,०३५

: कोरोनामुळे झालेले मृत्यू - १९,५६८

: सद्य:स्थितीत सक्रिय रुग्ण - ४,२४९

: लक्षणे नसलेले रुग्ण - ३,८२१

: लक्षणे असलेले रुग्ण - ४४९

: अत्यवस्थ असलेले रुग्ण - ०४

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in