वांद्रे पूर्व येथील स्कायवॉकची कोटींची उड्डाणे ; १६ कोटींचा खर्च ८३ कोटींवर खर्चात ४०० ते ५०० पटीने वाढ

आता नवीन स्कायवॉक बांधण्याच्या खर्चात ४०० ते ५०० पटीने वाढ झाली असून, नवीन निविदा मागवल्या त्यात तब्बल ८३ कोटी ६ लाखांचा खर्च अपेक्षित
वांद्रे पूर्व येथील स्कायवॉकची कोटींची उड्डाणे ; १६ कोटींचा खर्च ८३ कोटींवर खर्चात ४०० ते ५०० पटीने वाढ
Published on

मुंबईत पहिला स्कायवॉक वांद्रे येथे बांधण्यात आला. पहिला स्कायवॉक बांधण्यात आला त्यावेळी मोठा गाजावाजा झाला; मात्र काही महिन्यांत स्कायवॉकवर फेरीवाले, गर्दुल्ले यांनी कब्जा केला आणि स्कायवॉकचा वापर कमी झाला. अखेर हा स्कायवॉक जमीनदोस्त करण्यात आला. आता या ठिकाणी नवीन स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला असून, गेल्या वर्षी या कामासाठी निविदा मागवल्या त्यावेळी १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु आता नवीन स्कायवॉक बांधण्याच्या खर्चात ४०० ते ५०० पटीने वाढ झाली असून, नवीन निविदा मागवल्या त्यात तब्बल ८३ कोटी ६ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यावर वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी, अपघाताची शक्यता लक्षात घेता एमएमआरडीएने स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कलानगर असा पहिला स्कायवॉक सन २००८ मध्ये बांधण्यात आला. त्यानंतर मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे स्थानकाबाहेर एकूण ३६ स्कायवॉक बांधण्यात आले. त्यासाठी तब्बल ६०० हून कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले. सुमारे १.३ किमी लांबीचा असलेला वांद्रे स्कायवॉक प्रा. अनंत काणेकर मार्गावरील रिक्षांची अनागोंदी आणि बेशिस्त वाहतुकीमुळे पादचारी आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरला होता.

दररोज हजारो प्रवासी या स्कायवॉकचा वापर करत होते. परंतु एमएमआरडीएने हा स्कायवॉक मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला; मात्र २०१९ मध्ये हा स्कायवॉक धोकादायक जाहीर करत पालिका प्रशासनाने स्कायवॉक बंद केला. २०२१ मध्ये हा स्कायवॉक पाडून वांद्रे स्थानक ते वांद्रे न्यायालय नवीन स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाडकाम व नवीन बांधकामासाठी १६ कोटी रुपये खर्चाची निविदा मागवण्यात आली होती.

खर्चात ४०० ते ५०० पटीने वाढ

कंत्राट मंजुरी व कामाचे आदेश देण्यात आले होते. या स्कायवॉकचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर जुनी निविदा रद्द करण्यात आली. दरम्यान, आता पुन्हा नव्याने निविदा मागवण्यात आली असून, त्यात बांधकाम खर्चात तब्बल ४०० ते ५०० पट अधिक वाढ करण्यात आली आहे. २०२४ अखेरपर्यंत हा स्कायवॉक पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in