धोका टळला! ऑक्टोबरच्या १० दिवसांत मलेरिया, लेप्टोच्या रुग्ण संख्येत घट
आठवड्याला दुपटीने वाढ होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांत साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आल्याने मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूचा खतरा टळला आहे. दरम्यान, चिकनगुनीयावर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
मे महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा शिरकाव झाल्यानंतर कोरोना आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखणे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागा समोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. दरम्यान आठवड्याला साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ होत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र योग्य उपचार पद्धती, किटक नाशक विभागाच्या माध्यमातून दररोज करण्यात येणारी औषध फवारणी यांमुळे झपाट्याने पसरणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांत रुग्ण संख्येत घट झाली असून मलेरियाचे १२०, डेंग्यूचे ७८, लेप्टोचे १८, स्वाईन फ्लूचे ६ रुग्ण आढळले आहेत.