एक लाख मॅनहोलचा डेटा एका क्लिकवर!आरजीआय सॉफ्टवेअरमधून मिळणार सर्व माहिती

पम्पिंग स्टेशन परफॉर्मन्स मॉनेटेरिंग सिस्टिम आणखी अद्ययावत करण्यात येणार आहे
एक लाख मॅनहोलचा डेटा एका क्लिकवर!आरजीआय सॉफ्टवेअरमधून मिळणार सर्व माहिती
Published on

मुंबई : मॅनहोलचे झाकण कधी तुटले, कधी बदलले, कंत्राट कधी दिले, कंत्राट कधी संपणार, कंत्राटदार कोण याची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मुंबईतील एक लाख मॅनहोलसंदर्भात सविस्तर माहिती आरजीआय सॉफ्टवेअरमधून उपलब्ध होणार असून यामुळे मॅनहोलचा प्रश्न वेळीच निकाली काढणे शक्य होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाची एकूण एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. उघड्या मॅनहोलसंदर्भात मुंबई हायकोर्टाने अनेक वेळा मुंबई महापालिकेची कानउघडणी केली. मॅनहोल उघडे की बंदिस्त, याची तपासणी करण्यासाठी हायकोर्टाने नेमून दिलेले तज्ज्ञ वकील व मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी पाहणी करत अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला. पालिका प्रशासनाने अहवाल हायकोर्टात सादर केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मॅनहोलची अपडेट वेळीच उपलब्ध व्हावी, यासाठी आरजीआय सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत असून लवकरच मॅनहोलची अपडेट आरजीआय सॉफ्टवेअरमधून उपलब्ध होईल, असेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पम्पिंग स्टेशन्सची माहितीसुद्धा मिळणार

दिवसभरात पम्पिंग स्टेशन किती वेळ चालले, पम्पिंग स्टेशनचे लाईट बिल किती आले, याचा संपूर्ण डेटा उपलब्ध होणार आहे. ४५ सॅटेलाईट पम्पिंग स्टेशन व ८ मरीन आऊटफॉल आहेत. लॅबोरेटरीजचा रिपोर्ट काय, वर्षभरात पम्पिंग स्टेशनचा फ्लो किती, याची सविस्तर माहिती मिळणार आहे. यासाठी पम्पिंग स्टेशन परफॉर्मन्स मॉनेटेरिंग सिस्टिम आणखी अद्ययावत करण्यात येणार आहे.

एकूण मॅनहोल : १ लाख २८६

मलनिस््सारण विभाग : ७४ हजार ६९३

पर्जन्य जलवाहिन्या विभाग : २५ हजार ५९३

logo
marathi.freepressjournal.in