एमयूटीपी प्रकल्पांसाठी १३५ कोटी रुपयांची मागणी

एमयूटीपी प्रकल्पांसाठी १३५ कोटी रुपयांची मागणी

एमआरव्हीसीला काही दिवसांपूर्वी ‘एमयूटीपी’ २ आणि ३ प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून थकीत ३०० कोटी रुपये मिळाले. या प्रकल्पांमध्ये मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक प्रमुख लहान मोठ्या कामांचा समावेश आहे. परंतु भूसंपादन, कंत्राटदारांची थकीत बिले देण्यातच आतापर्यंत मिळालेला निधी खर्च झाल्याने उर्वरित कामे कशी करणार, असा सवाल एमआरव्हीसीकडून शासनाला करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून शिल्लक ७०० कोटी येणे असतानाच एमआरव्हीसीने रेल्वे मंत्रालयाकडेही १३५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ‘एमयूटीपी’अंतर्गत विविध रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ‘एमयूटीपी २’ मध्ये सीएसएमटी ते कुर्ला पाचवा, सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, तर एमयूटीपी ३ मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. निधीविना हे प्रकल्प गोगलगाय गतीने सुरू आहेत. मागील आठवड्यात राज्य सरकारकडून १ हजार कोटी रुपये निधीपैकी ३०० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. अद्याप ७०० कोटी येणे बाकी आहेत. परंतु हा शिल्लक निधी मिळाला नसल्याने प्रकल्पकामांना गती कशी द्यायची, अशी विचारणा एमआरव्हीसीकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून मिळालेल्या ३०० कोटी रुपयांचे वाटप झाल्यानंतर एमआरव्हीसीने रेल्वे मंत्रालयाकडे १३५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून यापूर्वीच अतिरिक्त ७०० कोटी रुपये एमआरव्हीसीला देण्यात आले आहेत. असे असतानाही आता आणखी निधीसाठी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत निधीची पूर्तता वेळेत आणि पूर्ण निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रकल्पांची कामे वेगाने मार्गी लागणार नसल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in