
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनंतर आता उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की, "ठाकरे सरकारने मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिले होते." असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री पद मला मिळणार नाही, हे आधीपासूनच ठरलं होतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याची कल्पना माझीच होती." असेदेखील त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. आजही माझे त्यांच्याशी कोणतेही वैर किंवा कटुता नाही. पाच वर्ष ज्यांच्यासोबत मी काम केले, त्यांनी माझा साधा एकही फोन उचलला नाही. याउलट गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असताना माझ्यावर वेगवेगळे खटले कसे दाखल करता येतील? यासाठी प्रयत्न करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला अडकवण्याचा टार्गेटच तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले होते.", अशी टीका त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री पदाबद्दल ते म्हणाले की, "मी पहिले तर उद्धव ठाकरेंचे आभार मानेन. कारण, त्यांच्यामुळेच हे सर्व जुळून आले आहे. त्यांनी ती परिस्थिती निर्माण केली नसती, तर आमदार नाराज झाले नसते आणि ते आमच्यासोबत आले नसते. मुळातच, मला पहिल्या दिवसापासून माहिती होते की मी मुख्यमंत्री होणार नाही. पण मलाही अखेरच्या क्षणाला कळले की मला उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे. मुख्यमंत्री होणार नाही, याची मला काहीही अडचण नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये मीच आघाडीवर होतो. मी मुख्यमंत्री पद घेत नाही, असा निर्णय मी वरीष्ठांना सांगितला होता. तेव्हा मला त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले आणि मी ते आदेश स्विकारले." पुढे ते म्हणाले की, " मुख्यमंत्री शिंदे आणि आम्ही २०२४ मध्ये अनेक राजकीय धक्के देणार आहोत. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास थांबला होता. तो विकास आम्हाला वाढवायचा आहे." असे मत त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर मत व्यक्त केले.