कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांनवर खड्डेकोंडीचे संकट कायम

पालिका दरवर्षी रस्तेबांधणी व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असते.
 कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांनवर खड्डेकोंडीचे संकट कायम

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांच्या खड्डेमुक्त प्रवासाबाबतचे महापालिकेचे दावे पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील डांबर, खडी वाहून गेली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत सात हजार खड्डे बुजवण्याचा पालिकेचा दावा फोल ठरला आहे. साचलेल्या पाण्यातून अडखळत वाट काढणाऱ्या वाहनचालकांना, तसेच पादचाऱ्यांना आता खड्डे चुकवत मार्गस्थ व्हावे लागत आहे.

पालिका दरवर्षी रस्तेबांधणी व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. तरीही दरवर्षी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांवर खड्डे पडतात. यंदाही लालबाग उड्डाणपूल, चर्चगेट, पवई, गोरेगाव, धारावीसह शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. समाजमाध्यमांवरही शहर आणि उपनगरांतील खड्यांवरून नागरिकांनी पालिकेला टीकेचे लक्ष्य केले आहे.

गेल्या वर्षी महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने तब्बल ४० हजारांहून अधिक रस्ते बुजवले होते. यंदाही खड्डे बुजवण्यासाठी विभाग कार्यालयांनी मोठ्या प्रमाणावर कोल्ड मिक्सची मागणी केली. २१७२.२५ मेट्रिक टन कोल्ड मिक्सचे वितरण विभाग कार्यालयांना केले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तरीही मुंबईत मात्र खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

फक्त पालिकाच कशी जबाबदार?

नागरिकाकडून येणाऱ्या तक्रारीमध्ये अनेकदा एमएमआरडीए, म्हाडा, बीपीटी अशा अन्य प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्यांचाही समावेश असतो. बऱ्याचदा त्यात पश्चिम द्रुतगती मार्ग, मेट्रो हद्दीतील मार्ग, विमानतळ हद्दीतील रस्ते यावरील खड्ड्यांच्याही तक्रारी असतात; मात्र त्यासाठीही नागरिक पालिकेला जबाबदार धरतात, असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in