
“शिवसेनेतील बंड हा त्यांचा अंतर्गत, खासगी प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही,” असे सांगत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी जास्त भाष्य करणे टाळले. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मौनाबद्दल ते म्हणाले की, “मौन बाळगण्यासाठी काही खास कारण नाही; मात्र काही बोलण्यासारखे नसेल म्हणून ते बोलत नसतील”.
भाजपवर होणाऱ्या आरोपांबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, “ते काहीही म्हणू शकतात; मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही.” अन्य एका प्रश्नावर ते म्हणाले की, “सुरक्षा पुरवणे ही केंद्राची जबाबदारी आहे. राज्य जेव्हा सुरक्षा देण्यास कमी पडते, तेव्हा स्वाभाविकपणे आपण केंद्राकडे मागणी करतो. ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग या स्वायत्त संस्था आहेत. त्यावर कोणी काही बोलायची गरज नाही. संजय राऊत काहीही बोलू शकतात,” असेही ते म्हणाले.