
निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मुदतीत कधीच कागदपत्रे सादर करायची नाहीत. मग विरोधात निर्णय गेला, की आमच्या नावाने ओरड करायची. हा केवळ सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक चिन्ह गोठल्याचे खरे दुःख तर आम्हाला आहे. समोरच्यांना असते तर त्यांनी लगेच नवीन चिन्हांची यादी दिली नसती. आम्ही अद्यापही नवीन चिन्ह दिलेले नाही. धनुष्यबाण आणि शिवसेना आमचेच आहे. आयोगाने ते आम्हालाच द्यावे, असा आमचा कायम प्रयत्न राहणार असल्याचे शिक्षणमंत्री तथा शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारी स्पष्ट केले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना आमच्याकडून वेळोवेळी कागदपत्रे तसेच प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली. समोरून मात्र कधीच योग्य ती कागदपत्रे किंवा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले नसल्याचे सांगून केसरकर म्हणाले, ‘‘यानंतर निकाल विरोधात गेल्यानंतर आमच्या नावाने ओरड करायची हा केवळ सहानुभूती मिळविण्याचा प्रकार आहे. देशात याआधीही जेव्हा पक्षांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा अंतरिम ऑर्डर अशाच प्रकारे देण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. समोरच्यांची बाजू खरी होती तर त्यांनी कागदपत्रे दिली पाहिजे होती. आता तर शपथपत्रे देखील बोगस कागदपत्रांद्वारे दिल्याचे प्रकार उघड होत आहेत. ती ज्यांनी करून दिली, ते नोटरी फरार आहेत. आमची तर साडेसात लाख सभासदांची यादीही आम्ही आयोगासमोर सादर केली आहे. उलट त्यांचीच बाजू खोटी आहे. निवडणूक चिन्ह गोठल्याचे खरे दुःख तर आम्हाला आहे. समोरच्यांना असते तर त्यांनी लगेच नवीन चिन्हांची यादी दिली नसती. आम्ही अद्यापही नवीन चिन्ह दिलेले नाही. धनुष्यबाण आणि शिवसेना आमचेच आहे. आयोगाने ते आम्हालाच दयावे असा आमचा कायम प्रयत्न राहणार आहे.
आयोगावरील टीका अयोग्य
निवडणूक आयोग ही स्वायत्त तसेच घटनात्मक संस्था आहे. समोरच्या बाजूकडून ज्या प्रकारे आयोगावर टीका करण्यात येत आहे ते योग्य नाही. समोरचे तर बाळासाहेबांच्या विचारांपासून खूप दूर गेले आहेत. ज्यांनी बाळासाहेबांच्या हयातीत ठाकरे कुटुंबिय आणि हिंदुत्वावर टीका केली, त्यांनाच आता यांच्या सभेत येऊन भाषणे करावी लागत आहेत, तेव्हा हिंदुत्व धोक्यात येत नाही का असा सवालही केसरकर यांनी केला. आम्ही लोकशाहीची हत्या केली म्हणतात, मग जेव्हा लोकांनी युतीच्या नावाने मते दिली व यांनी दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले, ती खरी लोकशाहीची हत्या होती, असा पलटवारही केसरकर यांनी केला.