मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये २०१४ व २०१६ मध्ये झालेल्या शहरी जमीन कमाल मर्यादा घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावल्यानंतर मीरा-भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांची बदली झाली आहे. ढोले यांना ईडीने बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत.
दिलीप ढोले हे राज्यातील शिवसेनेच्या नेत्याचे खास निकटवर्तीय समजले जातात. त्यांना ‘ईडी’ समन्स बजावल्यानंतर राज्य सरकारने तात्काळ कार्यवाही केली.
ठाणे पोलिसांनी शहरी जमीन कमाल मर्यादा घोटाळा २०१६ मध्ये उघड केला. अनेक विकासकांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रांचा वापर करून मीरा-भाईंदर मनपा हद्दीतील विशिष्ट भूखंड विकासाचे ग्रीन झोनऐवजी निवासी क्षेत्र म्हणून वर्गीकरण केल्याचे उघड झाले आहे. यामुळे बिल्डरना अतिरिक्त भूखंड मिळाले. त्यामुळे सरकारला तोटा झाला. या प्रकरणात बिल्डरनी मनपा अधिकाऱ्यांना लाच दिली.
तथापि, २०२१ मध्ये एका बिल्डरने काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले की, त्यांनी काही बिल्डर्सची बाजू घेतली होती. परिणामी, महाराष्ट्र सरकारने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची विरोधात चौकशी सुरू केली. त्यानंतर काहींना अटक करण्यात आली.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, शहरी जमीन कमाल मर्यादा घोटाळ्याचा तपास आता ईडीने हाती घेतला आहे. यात अनेक बिल्डर व अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्यात ढोले यांचा समावेश आहे.