
राज्यसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. विधान परिषद आणि राज्यसभेतही विरोधी पक्ष असलेल्या भाजपने बाजी मारल्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतरच्या विश्वासदर्शक ठरावात एकनाथ शिंदे सरकारला १६४ मते मिळाली. आता त्यात आणखीन १० ते १२ मतांची वाढ होण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात बंडखोर आमदार नाराज झाले तर त्यांचे मत कमी होऊ शकते, यामुळे आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या विस्तारात मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी करायचा आणि राष्ट्रपती निवडणुकीनंतर उर्वरित मंत्र्यांना शपथ द्यायची, अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार भाजपच्या नेत्यांनी केला आहे. सर्व मतदारांकडून मतदानाची रंगीत तालीम करून घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील सत्तापालट झाल्यानंतर भाजप नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून १६४ या बहुमताच्या आकड्यापेक्षा १० ते १२ अधिक मते विधानसभेतून मिळावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार केल्यास शिंदे गटातील ज्या आमदारांना मंत्रिपदाची आश्वासने मिळाली किंवा ज्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत, हे नाराज होऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गटातील १४ आमदारांना तर भाजपच्या २९ आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यातील किती पदे केव्हा भरायची अथवा काही जागा रिक्तच ठेवायच्या का, याबाबतही भाजपच्या गोटात खलबते सुरू आहेत.