पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून शिंदे गटात नाराजी; शिंदे गटाच्या खासदाराला नियोजनाचे कळवलेच नाही

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नगर येथे आढावा बैठक असल्याचे कळले होते.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून शिंदे गटात नाराजी;
शिंदे गटाच्या खासदाराला नियोजनाचे कळवलेच नाही

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबर रोजी शिर्डीच्या दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात जिल्ह्यातील दक्षिणेकडील नेत्यांनाही फारसे विश्वासात घेतले नाही. त्यातच आता शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान शिर्डी दौऱ्यावर येत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाच दौरा नियोजनाची माहिती दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यावरून खा. लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून भाजप-शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून दक्षिण अहमदनगर भाजप नेते प्रा. राम शिंदे यांच्यासह आ. मोनिका राजळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे, तर बड्या नेत्यांचे सर्व राजकीय कार्यक्रम उत्तर नगरमध्येच कसे, असा सवालही उपस्थित केला होता. त्यावरून भाजपमध्येच गटबाजी झालेली असताना आता शिर्डीच्या खासदारांनाही याबाबत विश्वासात घेत नसल्याचे समोर आले आहे. शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांनी सोमवारी शिर्डी शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी विखे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिर्डीत आपण एम्स हॉस्पीटल, आयटी पार्क सुरू करण्याची मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचे सांगितले. यासोबतच जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीचेही निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप-शिंदे गटातील मतभेदही वाढण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नगर येथे आढावा बैठक असल्याचे कळले होते. त्यामुळे आपण बैठकीसाठी गेलो, तेव्हा तलाठी निरोप घेऊन गेले होते, असे कळले. बैठक सकाळी ११ वाजता होती आणि ८ वाजता निरोप दिला जातो. मी खासदार आहे. माझा मतदारसंघ राखीव असला, तरी स्वाभिमानी आहे. मी लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे. मला लोकांनी निवडून दिले आहे. पंतप्रधान मोदी कामांचे लोकार्पण करण्यासाठी आपल्या मतदारसंघात येत आहेत. योग्य वेळी बोलून दाखवू. पण आता पंतप्रधानांच्या स्वागताची वेळ आहे, अशा शब्दांत खा. लोखंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. त्यामुळे आगामी काळात भाजप-शिंदे गटातील मतभेदही वाढण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in