‘मुंबई दर्शन’ ओपन डेक बसनेच बेस्ट खरेदी करणार दुमजली ‘ओपन डेक’ बसेस

बेस्ट उपक्रमाने याबाबतची माहिती दिली.
‘मुंबई दर्शन’ ओपन डेक बसनेच बेस्ट खरेदी करणार दुमजली ‘ओपन डेक’ बसेस

मुंबई : मुंबईकर तसेच परदेश आणि परराज्यातील पर्यटकांची पसंती असलेली ‘ओपन डेक बसेस’ इतिहासजमा होणार, अशा बातम्या झळकताच, बेस्ट उपक्रमाने नवीन ओपन डेक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बुधवारी बेस्ट उपक्रमाने याबाबतची माहिती दिली.

बेस्ट उपक्रमामार्फत ‘मुंबई दर्शन’ या सेवेसाठी ‘ओपन डेक’ बसगाड्या प्रवर्तित करण्यात येत आहेत. परंतु बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या असलेल्या ३ ‘ओपन डेक’ बसगाड्यांचे आयुर्मान १५ वर्षे पूर्ण होत असल्याने शासन निर्णयाप्रमाणे या गाड्या ५ ऑक्टोबर २०३३ रोजी मोडीत काढण्यात येणार आहेत. मुंबईच्या जनतेचे आणि पर्यटकांचे ओपन डेक बसगाड्यांबाबतचे प्रेम आणि त्यांना या बसगाड्यांतून मिळणारा वेगळा अनुभव, ‘मुंबई दर्शन' बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद विचारात घेता, बेस्ट उपक्रमातर्फे नवीन दुमजली ‘ओपन डेक’ बसगाड्या खरेदी करण्याची प्रक्रियादेखील सुरू केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

वातानुकूलित डबलडेकर बसेस पर्यटकांच्या सेवेत!

दुमजली ओपन डेक बसगाड्यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, ‘मुंबई दर्शन’ बससेवा खंडित हाऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसगाडया ‘मुंबई दर्शन’ करिता प्रवर्तित करण्यात येत आहेत. सोमवार ते शुक्रवार या दिवशी ३ वातानुकूलित दुमजली बसगाड्या आणि शनिवार व रविवार या दिवशी ५ वातानुकूलित दुमजली बसगाड्या पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

या ठिकाणची मुंबई सैर!

गेल्या अनेक वर्षापासून पर्यटकांसाठी ‘मुंबई दर्शन’ सेवा पुरविली जाते. या ‘मुंबई दर्शन’ सेवेमार्फत पर्यटकांना मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, आरबीआय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस, एनसीपीए, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ आदी ठिकाणची सैर केली जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in