बेस्टच्या डेपोत दुमजली पार्किंग सुविधा

तीन डेपोत सुविधा उपलब्ध करणार; अभ्यासासाठी समितीची स्थापना
बेस्टच्या डेपोत दुमजली पार्किंग सुविधा

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पुढील तीन वर्षांत बसेसची संख्या १० हजारांवर पोहोचणार आहे. बसेसच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी बेस्टच्या पाच बस डेपोत दुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी गोवंडी, दिंडोशी, वांद्रे या तीन डेपोत पार्किंगची व्यवस्था करण्याचे विचाराधीन आहे. याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

बेस्टच्या बसेसना प्रवाशांची पसंती लक्षात घेता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील होत आहेत. येत्या दोन वर्षात साडेचार हजाराहून अधिक बस गाड्या बेस्टच्या ताफ्यात आणण्याचे नियोजन बेस्ट उपक्रमाचे आहेत; मात्र बस गाड्या पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. नवीन बस आगार बांधण्यासाठी बेस्टकडे जागा नाही. त्यामुळे बस आगारात दुमजली पार्किंग उभारल्यास वाढणाऱ्या बसेसना पार्क करता येणार आहेत. कारण २०२७ साला पर्यंत बेस्टचा ताफा १० हजारापर्यंत जाईल. त्यामुळे भविष्यात बस गाड्यांना पार्किंगसाठी जागेचा प्रश्न निर्माण होऊ नये याचा विचार करून बेस्टने दुमजली बस पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गोवंडी, दिंडोशी आणि वांद्रे हे तीन आगार दुमजली पार्किंगसाठी निवडण्यात आले आहेत. आणखी काही आगार यासाठी निवडले जाणार आहे. व्यवहार आणि इतर गोष्टींचा विचार करण्यासाठी समिती नियुक्ती केली जाणार आहे.

बेस्टच्या २ हजार ९६८ बस

सध्या बेस्ट उपक्रमाकडे २ हजार ९६८ बस असून, आगामी दोन वर्षात ४ हजार ५०० नवीन बस गाड्या येणार आहेत. तसेच २०२७ पर्यंत बस ताफा १० हजार पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट बेस्ट उपक्रमाने ठेवले आहे. या बस गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दुमजली पार्किंग उभारले जाणार आहे. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ( आयएफसी ) ही वर्ल्ड बँकेची सल्लागार असलेली कंपनी या सर्वाचा अभ्यास करणार आहे.

बेस्टची २७ बस आगार

या प्रकल्पात बेस्ट उपक्रम या प्रकल्पाची व्यवहार्यता तसेच उपयोगिता तपासून पाहणार आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे बेस्टच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या बेस्टची २७ बस आगार असून, त्यात ३ हजार ९४१ बस उभ्या करता येतात. तसेच सॅटॅलाइट पार्किंग व बेस्टची इतर मालमत्ता यावर असलेल्या पार्किंग मधून ५११ बस गाड्या उभी करण्याची क्षमता आहे.; मात्र तीही अपुरी ठरणार असल्यामुळे बेस्ट उपक्रमाने दुमजली पार्किंगचा विचार सुरू केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in