
मुंबई : सुमारे २५ लाख रुपयांच्या हेरॉईनसह एका ड्रग्ज तस्कराला मालवणी पोलिसांनी अटक केली. समीर यासीन शेख ऊर्फ समीर कान्या असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी १२५ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी दुपारी मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. मालवणीतील एनसीसी, प्लॉट क्रमांक ६०/७१ जवळ गस्त घालताना पोलिसांना एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकाऱ्यांना सुमारे २५ लाख रुपयांचे १२५ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. चौकशीत तो तिथे हेरॉईन विक्रीसाठी आल्याचे उघडकीस आले. हेरॉईन बाहगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता.