दक्षिण मुंबईतील रस्त्यांची बिकट अवस्था,वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त

दक्षिण मुंबईत यंदा पावसाचा जोर वाढला आहे. याचा फटका रस्त्यांना बसला असून खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.
दक्षिण मुंबईतील रस्त्यांची बिकट अवस्था,वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त

गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामांची पोलखोल केली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे पॉश समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.

दक्षिण मुंबईत यंदा पावसाचा जोर वाढला आहे. याचा फटका रस्त्यांना बसला असून खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खास करून अनेक चौकांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गिरगाव, भायखळा, लालबाग, सायन, वडाळा तेथील अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्त्यांवरील खड्डे कोल्डमिक्सने; तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या मदतीने बुजवले जात आहेत; मात्र पावसाने उसंत न घेतल्याने वाढत्या पावसाने भरलेले खड्डे पुन्हा उखडत आहेत. त्यामुळे या खड्ड्यांचे करायचे काय, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. सध्या शक्य होईल तसे खड्डे बुजवण्यात येत असून पाऊस थांबण्याची वाट अधिकारीवर्ग बघत आहे. चेंबूरजवळ पडलेल्या खड्ड्यांचा परिणाम पूर्व द्रुतगती मार्गावर झाला असून वाहतूक संथगतीने सुरू असते. यामुळे दक्षिण मुंबईत कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा होत आहे. सायनमधून सीएसएमटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे आहेत. शिवाय मुसळधार पावसात सखल भागांत पाणी साचत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहनकोंडीमुळे प्रवासी आणि वाहनचालक हैराण झाले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in