मुंबई : शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना शिवडी, भायखळा, नागपाडा आणि रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. त्यात तीन महिलांचा समावेश असून ते सर्वजण बांगलादेशातील उपासमारी आणि बेरोजगारी कंटाळून बांगलादेशातून भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक राहत असल्याने या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. ही मोहीम सुरू असताना शिवडी परिसरात काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती शिवडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी कौलाबंदर येथील एका झोपडीतून अल्लाउद्दीन अब्दुल जब्बार शेख, अमजद अहमदअली खान, अत्ताउल्ला हमबारी मोंडल या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या तिघांचे मूळ नाव आश्रफअली मंसुरअली, अल्लाउद्दीन जब्बार मियॉं आणि अन्वर हुसैन अल्लाउद्दीन होते. त्यांनी बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पॅनकार्ड, आधारकार्ड, जन्मदाखला आणि पासपोर्ट लेबर कन्स्ट्रक्शनचे दस्तावेज बनवून घेतल्याचे तपासात उघडकीस आले. या तिघांकडून भारतीयसह बांगलादेशी चलन पोलिसांनी जप्त केले आहे. दुसऱ्या कारवाईत नागपाडा पोलिसांनी इती अबुल शेख आणि लबली अब्दुल रशीद अख्तर, माया अबदुल सत्तार सरदार या तीन महिला बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या तिघीही नागपाडा येथील कामाठीपुरा, तेरावी गल्लीत वास्तव्यास होत्या. या ठिकाणातून पोलिसांनी पोलिसांनी सात महिलांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी पाच महिला बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले होते. त्यापैकी दोघींवर खटला सुरु असून इतर तिघींना नंतर पोलिसांनी अटक केली. अशाच अन्य दोन कारवाईत भायखळा पोलिसांनी मोहम्मद रियाल इस्लाम हासीम अली शेख याला माझगाव येथून तर मोहम्मद हुसैन अली रमोजुद्दीन शेख याला शिवडीतून रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक ेली. मोहम्मद रियाल हा शिवडी येथे राहत असून चालक म्हणून काम करतो तर मोहम्मद हुसैन हा इलेक्ट्रीशियन म्हणून कामाला होता. ते सर्वजण बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून भारतात आले होते. कोलकाता येथून नंतर मुंबईत आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. लवकरच या सर्वांना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांच्या देशात पाठविले जाणार आहे.