पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित

मशिदीवरील भोंगे आणि आणि हनुमान चालीसा या वादात राज्यातील मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा करण्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला असला, तरी शिवसेना युवानेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख नक्की झाली असून, येत्या १५ जूनला ते अयोध्या येथे जाणार आहेत. त्याच दिवशी ते शरयू तीरी आरती करणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी काही शिवसेनानेते अयोध्येत जाऊन आदित्य यांच्या दौऱ्याची तयारी आणि त्यासंबंधीचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी स्वतः शिवसेना खासदार संजय राऊत अयोध्येला जाऊन तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई असे १५ जण अयोध्येला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भोंग्याच्या राजकारणानंतर पायावरील शस्त्रक्रियेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौरा स्थगिती केला होता; मात्र त्याचवेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपला दौरा जाहीर केला होता; पण आदित्य ठाकरे यांनी तारिख जाहीर केली नव्हती. ‘‘१५ जून रोजी आम्ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्येला जाणार आहोत. महाराष्ट्रातून काही नेते जातील. अयोध्या दौरा हा धार्मिक आहे. शक्तिप्रदर्शन करणार नाही,’’ असे संजय राऊत यांनी दौऱ्याबाबत सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in