
२० वर्षांत खड्डे बुजवण्यासाठी तब्बल २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर पडलेले खड्डे पुढील ४८ तासांत पूर्ववत करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार मिहिर कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पुढील ४८ तासांत भरण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका रेणू हंसराज आदी उपस्थित होते. मुंबई शहरात गेल्या २० वर्षांत २१ हजार कोटी रस्ते बनविण्यासाठी खर्च करण्यात आला; मात्र तरीही प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. परिणामी, मुंबईतील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. वाहनांचा खोळंबा होतो. याही पावसाळ्यात मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्या त्या विभागातील रस्ते अभियंत्यासोबत खड्ड्यांची पाहणी केली असता खड्ड्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे निदर्शनास आले.