
आता मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) एसटी महामंडळाच्या साध्या बसेस (ST Bus) धावणार नाहीत. यासंदर्भात एसटी महामंडळाने परिपत्रक काढले. फक्त शिवनेरी बसेस या नव्या महामार्गावरून प्रवास करणार आहेत. त्यामुळे आता मुंबई-पुणे महामार्गावर लालपरी दिसणार नाही. त्यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एसटीच्या साध्या बस या जुन्या महामार्गावरून चालवण्याचे आदेश देण्यात आले. शिवनेरीशिवाय इतर एसटी बसने नव्या महामार्गावरून प्रवास केल्यास बस चालकावर कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.
अनेक साध्या एसटी बसेस नव्या महामार्गावरून जात असल्याने मोठा फटका एसटी महामंडळाला बसतो आहे. प्रवासी भारमान कमी होणे आणि टोलचा अधिकच भार यामुळे दुहेरी नुकसान महामंडळाचे होत आहे. यापूर्वीही एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवल्या जात होत्या. मात्र, काही चालक परस्परपणे नव्या महामार्गावरून एसटी चालवत होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेतली. नव्या महामार्गामुळे शिवनेरी वगळता इतरही एसटीच्या बसेस या मार्गावरून धावू लागल्या. पण यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका एसटीला दोन्ही बाजूने ४८५ रुपये टोल द्यावा लागतो. तर नवीन द्रुतगती मार्गावरून जाण्यासाठी त्याच एसटीला ६७५ रुपयांचा टोल द्यावा लागतो. त्यामुळे एका एसटीमागे १९० रुपयांचा भुर्दंड पडतो.