१२ वर्षात नालेसफाईवरील खर्च जवळपास दहापटीहून अधिक पटींनी वाढला

१२ वर्षात नालेसफाईवरील खर्च जवळपास दहापटीहून अधिक पटींनी वाढला

सध्या राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिकांवर प्रशासकीय राज्य सुरू आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने पावसाळापूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच प्रशासकीय राजवटीमुळे नालेसफाईच्या कामांना काहीसा विलंब झाला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील ११२ किलोमीटर लांबीचे ४४ नाले असून गेल्या १२ वर्षात नालेसफाईवरील खर्च जवळपास दहापटीहून अधिक पटींनी वाढला आहे. शहरातील जवळपास ९० टक्के नाल्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले असताना गेल्या वर्षी नालेसफाईवर जवळपास १५ कोटींचा खर्च करावा लागला. चालू वर्षाच्या बजेटमध्ये ८ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले असले तरी त्यातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे

नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू व्हायला हवीत. परंतु बऱ्याचदा ही कामे वेळेत केली जात नाहीत. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात काहीशी उशिरा नालेसफाई सुरू करण्यात आल्याने पावसाळा आला तरी नालेसफाईच्या कामाची लगीनघाई सुरू असल्याचे चित्र होते. दरम्यान, यंदा वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी मार्चअखेर निविदा काढण्यात आल्या. मात्र काही प्रभागातील निविदांना मुदतवाढ द्यावी लागली, मात्र तरी यंदा काम वेळेत सुरू करण्यात आली असून अद्याप बहुतांशी शहरातील नाले कचऱ्यांनी तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, नालेसफाईची कामे सुरू होऊन १५ दिवस झालेले असताना ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या कामांची पाहणी केली आणि शहरात ५० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नालेसफाई सुरू आहे की हातसफाई, अशी चर्चा शहरात पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील ११२ किलोमीटर लांबीचे ४४ नाले असून २०१० साली नालेसफाईच्या कामांवर फक्त १ कोटी ३० लाख रूपये खर्च केले होते. मात्र या खर्चात दरवर्षी मोठी वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे १२ वर्षात हा खर्च जवळपास दहापटीहून अधिक वाढला आहे. शहरातील जवळपास ९० टक्के नाल्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले असताना गेल्या वर्षी नालेसफाईवर जवळपास १५ कोटींचा खर्च करावा लागला. चालू वर्षाच्या बजेटमध्ये ८ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले असले तरी त्यातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कामवाटप करताना हितसबंध जपणाऱ्या कंत्राटदारालाच कामाचे वाटप होत असल्याचे आरोपही वेळोवेळी झाले आहेत. दरवर्षी पावसाळापूर्व कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असले तरी नाल्यांची सफाई कधीच वेळेत पूर्ण केली जात नाही, हा आजवरचा इतिहास आहे. वरवरची सफाई केली जाते आणि नालेसफाई झाल्याचे दाखवून बिले पास केली जातात. विशेष म्हणजे नालेसफाई किती झाली, हे मोजण्याचे काही साधन उपलब्ध नसल्यामुळे याचा फायदा आधिकारी आणि ठेकेदार घेतात. अशाप्रकारे संगनमताने पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचे आरोप वेळोवेळी झाले आहेत.

२६ जुलै २००५ रोजी आलेल्या महाप्रलयाने ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणच्या नालेसफाईच्या कामांवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर नालेसफाईची कामे बहुतांशी ठिकाणी काटेकोरपणे सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एक-दोन वर्षे हा विषय गंभीरपणे हाताळण्यात आला. मात्र त्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे नालेसफाईचे नाटक सुरू झाले. शहरातील बहुतांशी नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी नाल्यात पाणी ओसंडून वाहते आणि शहरातील रस्ते, झोपडपट्ट्यांतील घरे पाण्याखाली जातात. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र नाल्यांची सफाई कधीच पूर्णपणे केली जात नाही. दुसरीकडे जरी नालेसफाई झाली तरी काहीच दिवसात पुन्हा तेच नाले कचऱ्यांनी भरून जातात. त्यामुळे शहरातील नाले पूर्णपणे कधीच साफ होऊ शकत नाहीत, असे प्रशासनातील अधिकारीच उघडपणे सांगतात.

वेळोवेळी नवे प्रयोग

योग्य प्रकारे नालेसफाई व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक प्रभाग समितीनिहाय निविदा काढून जास्तीचे ठेकेदार नेमण्यात येतात. त्यामुळे युद्धपातळीवर नालेसफाईचे काम करण्यात येते आणि नाल्यातील कचरा काढण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असतो. मात्र जेव्हा शहरात मोठा पाऊस पडतो तेव्हा शहरातील बहुतांशी रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली जातात, हा शिरस्ता आहे. प्रशासनाकडून नालेसफाई योग्य पद्धतीने करण्यासाठी निर्णय घेतले जातात, या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र नाल्यांची सफाई कधीच पूर्ण केली जात नाही.

काढलेला कचरा पुन्हा जातो नाल्यात

दुसरीकडे जो मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात येत आहे, तो काही ठिकाणी तत्काळ उचलण्यात येत नसल्याने तो काढण्यात आलेला कचरा पुन्हा नाल्यात वाहून जात असल्याने काढलेला कचरा बऱ्याच ठिकाणी उचलला जात नाही. त्यामुळे पहिल्या पावसात तोच कचरा पुन्हा नाल्यात वाहून जातो. पहिल्या पावसात अशी भयावह परिस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मेट्रोच्या कामामुळे अडचणीत भर

घोडबंदर परिसरात सध्या महामार्गालगत मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असल्याने टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत. मात्र त्यासाठी बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी ते चुकीच्या पद्धतीने नाले वळवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळयात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in