खंडणीखोर फरार कस्टम अधिकारी अंमली पदार्थ विभागात

प्रवाशांकडून जीपे किंवा मोबाईल बँकिंग वॉलेटमधून पैसे लोडरच्या वैयक्तिक खात्यात भरायला सांगितले जातात
खंडणीखोर फरार कस्टम अधिकारी अंमली पदार्थ विभागात

मुंबई : नीलकमल छोटालाल सिंग या फरार कस्टम अधिकाऱ्याची नियुक्ती अत्यंत संवेदनशील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अंमली पदार्थविरोधी पथकात झाल्याने कस्टमच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

नीलकमल छोटालाल सिंग हे कस्टम अधीक्षक असून त्यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गेल्याच महिन्यात १ कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच नीलकमल सिंग यांची बदली अत्यंत संवेदनशील कस्टमच्या अंमली पदार्थ विरोधी विभागामध्ये झाली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून सिंग हे फरार असून त्यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. त्यांच्या चौकशीसाठी विमानतळ कस्टम विभागात पोलीस गेले तेव्हा ते रजेवर असल्याचे कळले.

जून २०२३ मध्ये खंडणीचा गुन्हा रेल्वे राजकीय पोलिसांनी दाखल केला. त्यानंतर तो आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हस्तांतरित केला. उद्योगपती अलीअसगर पाटणवाला यांनी ही तक्रार दाखल केली होती. ३.५ कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी पाटणवाला यांना नीलकमल सिंग व ललित बिलसारे यांनी अटकेची धमकी दिली होती. त्यानंतर एक कोटी रुपयात तडजोडीची रक्कम ठरवली. या प्रकरणी आम्ही नीलकमल सिंह व ललित बिलसारे यांची चौकशीची लेखी परवानगी विमानतळ कस्टम विभागाकडे केली. मात्र, कस्टम विभागाने आम्हाला सहकार्य केले नाही. ते दोन्ही आरोपी जबाब नोंदवायला आले नाहीत, असे आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खंडणी व फसवणुकीचे फौजदारी गुन्हे दाखल असतानाही सीमाशुल्क अधीक्षक नील कमल यांच्या अनियमिततेचे स्पष्टीकरण देण्यास वरिष्ठ विमानतळ कस्टम अधिकारी अयशस्वी ठरले. आता या आरोपी कस्टम अधिकाऱ्याला पोलिस तपास होईपर्यंत निलंबित करण्यात आले.

विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी कस्टम अधीक्षकाला वरिष्ठ सीबीआयसीच्या सदस्यांकडून संरक्षण दिले जात आहे. त्यामुळेच त्याची विमानतळावरील अंमली पदार्थ विभागात बदली झाली. मुंबई विमानतळावरील कस्टम विभाग हा डिजीटल खंडणीखोरीमुळे यापूर्वीच बदनाम आहे. सोन्याच्या खोट्या गुन्हयांमध्ये प्रवाशाला अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी गोळा केली जाते. यासाठी विमानतळावरील लोडरचा वापर केला जातो. प्रवाशांकडून जीपे किंवा मोबाईल बँकिंग वॉलेटमधून पैसे लोडरच्या वैयक्तिक खात्यात भरायला सांगितले जातात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in