खोटारडेपणा राजमान्य समाजमान्य

खोटारडेपणा राजमान्य समाजमान्य

खोटारडेपणा हा राजमान्य असू शकतो का? तो समाजमान्य असू शकतो का? या प्रश्नांचं उत्तर काय असू शकतं? तर ते होय असं आहे. होय! खोटारडेपणा हा राजमान्यही आहे आणि समाजमान्यही आहे. न्यायालयात नाही का, वादी आणि प्रतिवादी दोन्हीही देवाची (३३ कोटींपैकी नेमका कुठला, ते तो देवच जाणे!) शपथ घेऊन किंवा धर्मग्रंथावर हात ठेवून किंवा सद‌्सद‌्‌‌विवेकबुद्धीला स्मरून खरं बोलीन असं न्यायालयासमोर कबूल करतात; पण दोघांपैकी एक पूर्णपणे किंवा दोघेही थोडं थोडं खोटं बोलत असतात हे तर उघड गुपीत आहे आणि तेही राजमान्य!

खोटं बोलणं हे पाप आहे, हे जे शाळेत शिकवलं जातं ना तेच मुळात खोटं आहे. खोटं बोलणं हे जर खरोखरच पाप असेल तर तमाम वकील आणि राजकारणी मेल्यानंतर स्वर्गवासी होत असतील की नरकवासी होत असतील? मग त्यांच्या गच्छंतीनंतर त्यांच्या नावाआधी स्वर्गवासी लिहावं की नरकवासी लिहावं? या प्रश्नाचं खरं उत्तर एखादा वकील खोटं न बोलण्याचा शपथेवर किंवा एखादा राजकारणी 'ऑफ द रेकॉर्ड' देईल का?असाच एक समाजमान्य खोटारडेपणा म्हणजे वैकुंठधामातला श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम! एखाद्या यशस्वी वकिलाला श्रद्धांजली वाहतांना, ‘हा माणूस भयंकर खोटारडा होता. आयुष्यभर याने खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून सगळ्या केसी (केसेस या इंग्रजीतल्या अनेकवचनी शब्दासाठीचा खास गावरान शब्द.) जिंकल्या आणि पुढच्या १० पिढ्यांना पुरेल इतका पैसा कमावला. मग्रुरी होती साल्याला, याला पाहून माणसं रस्ता बदलायची. गरिबांना कधीच मदत केली नाही याने. नरकात जाईल साला. हा येतोय म्हटल्यावर यमाने एव्हाना भल्या मोठ्या कढईत तेल उकळायला ठेवलंही असेल!' अशी मनात असलेली द्वेषांजली, तोंडातून बाहेर पडताना मात्र ‘आपले नानासाहेब हे अत्यंत बुद्धिमान होते. आपल्या बुद्धीच्या जोरावर ते एक यशस्वी वकील बनले; पण आपल्या यशाचा अहंकार त्यांना कधी शिवला नाही. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते समाजात अतिशय लोकप्रिय होते. गोरगरिबांना मदत करायला ते सदैव तयार असत. आज स्वर्गात सर्व देवी-देवता त्यांच्या स्वागतासाठी ओंजळीत फुलं घेऊन उभे असतील.’ अशी श्रद्धांजली बनून बाहेर पडते. हा खोटारडेपणा सर्वांनाच माहीत असतो आणि तो सर्वांनाच नाइलाजाने का होईना मान्य करावा लागतो; कारण 'गेलेला' जात्यात असतो, तर 'पोहोचवायला' आलेले सुपात असतात!एखादा राजकारणी 'गेल्या'नंतर त्याला श्रद्धांजली वाहतांना हमखास म्हटलं जाणारं, ‘यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.' हे वाक्य म्हणजे तर खोटरडेपणाचा कळसच असतो.

एकेका राजकारण्याच्या जाण्याने जर अशी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असती, तर 'बमुर्डा ट्रँगल'मध्ये जशी विमानं गायब होतात, तशी आपली पृथ्वी कधीच त्या पोकळ्यांमध्ये गायब झाली असती!ऑफिसमधून लवकर बाहेर पडण्यासाठी किंवा रजा घेण्यासाठी केला जाणारा खोटारडेपणा तर राजमान्यही असतो आणि समाजमान्यही असतो! त्याच्यावर लिहायचं ठरवलं तर रामायण, महाभारतापेक्षाही मोठा आणि लोकप्रिय ग्रंथ तयार होऊ शकतो. या दोन कारणांसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचा परिवार हा महाभारतातल्या कौरवांच्या परिवारापेक्षाही मोठा झालेला असतो. त्यात असंख्य काका, काकू, मामा, माम्या, मावश्या, आत्या, चुलते, आजोबा, सासू, सासरे हे रेशनच्या किंवा बेस्टच्या रांगेत उभे राहावे तसे मरणाच्या दारात रांगेत उभे असतात. जसजशी या महाशयांना 'हाफ डे'ची किंवा 'कॅज्युअल लिव्ह'ची गरज भासते, तसतशी ही मंडळी एक एक करून मरत जाते! (पक्षी मारली जाते!) रजा मंजूर करणाऱ्यालाही यातला खोटारडेपणा माहीत असतो; पण दुसऱ्या दिवशी त्यालासुद्धा मैत्रिणीसोबत पिक्चरला जाण्यासाठी आपला एक नातेवाईक मारायचा असतो ना! म्हणून मग, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा ‘हाफ डे’साठी आणि ‘कॅज्युअल लिव्ह’ साठी मारल्या गेलेल्या सर्व नातेवाईकांची गणना केली आणि ती जर रोजच्या रोज बातम्यांमध्ये दाखवली तर लोकांना कोरोना बळींची संख्यासुद्धा किरकोळ वाटायला लागेल. अशी गणना केली तर कदाचित आपली लोकसंख्या उणे अंकात नोंदवावी लागेल!जाता जाता मित्रांसोबत 'जाम मिलाये जाम के साथ' केल्यामुळे झालेला उशीर जाममध्ये अडकलो होतो, असं बायकोला सहसा न पटणारं कारण सांगून पचविण्याचा खोटारडेपणा हा ‘नरो वा कुंजरावो’ या प्रकारात मोडणारा असल्यामुळे आणि असला खोटारडेपणा महाभारतातही झालेला असल्यामुळे त्यास बायकोची मान्यता मिळो न मिळो; पण समाज मान्यता मिळालेलीच आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in