कंत्राटी कामगारांच्या आंदोलनात कुटुंबाचा सहभाग ;बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन चिघळणार

कंत्राटी कामगारांच्या आंदोलनात कुटुंबाचा सहभाग ;बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन चिघळणार

बेस्टमधील नैमित्तिक कामगार गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसले आहेत

मुंबई : कायमस्वरूपी सेवेत घ्या, या मागणीसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कंत्राटी कामगारांच्या आंदोलनात आता त्यांची कुटुंबे सहभागी होणार आहेत. शुक्रवारी वडाळा बस आगाराबाहेर कंत्राटी कामगारांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका आयुक्त व बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक यांची संयुक्त बैठक पार पडणार असून बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेस्टमधील नैमित्तिक कामगार गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसले आहेत. बेस्टच्या सेवेत कायम करा, या मागणीवर ते ठाम आहेत. गेली १७ वर्षे ते तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष गणेश शिंदे, मनोहर जुन्नरे, देवेंद्र कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्या कामगारांना भेट दिली. कामगारांच्या मागण्यांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बंगल्यात बैठक घेण्यात आली, या बैठकीत विरोधी पक्षनेते दानवे यांनी तत्काळ महापालिका आयुक्त इक्बाल चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांना पत्र पाठवून कामगारांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची सूचना केली.

logo
marathi.freepressjournal.in