
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर आणि नवीन सरकारने नियमांमध्ये सूट दिलेल्या धर्तीवर यंदाचा गणेशोत्सव चांगलाच धामधुमीमध्ये पार पडला. गेल्या दहा दिवसांपासून गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवसाचा महाराजा म्हणून प्रसिद्ध असलेला लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून, मोठमोठे राजकीय नेते, सेलेब्रिटी यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा डोळ्यांनी पार पडला. तब्बल 23 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.
अंगावर समुद्राचे पाणी उडवून बोटीतून लालबागच्या राजाला अभिवादन करण्यात आले. खास सजवलेल्या तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात सोडण्यात आली. बाप्पाला अथांग समुद्रात निरोप देण्यात आला. 10 दिवस घरातील वातावरण प्रसन्न करणारे आणि घरात आनंद आणणारे गणपती बाप्पा आपल्या गावाकडे रवाना झाले. मात्र यावेळी गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.