विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे महिला रेल्वे प्रवाशांमध्ये भीती

५ वर्षात ५०० हून अधिक विनयभंगाच्या तक्रारी; रेल्वे पोलिसांची माहिती
विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे महिला रेल्वे प्रवाशांमध्ये भीती
Twitter

दोन दिवसांपूर्वी मुंबईत पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात महिलेसोबत विनंयभंगाचा प्रकार घडला. बोरिवली स्थानकातून अंधेरीच्या दिशेने कामानिमित्त प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार महिला डब्यात घडल्याने मुंबईसह उपनगरीय रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील ५ वर्षात रेल्वे प्रवासादरम्यान विनयभंग झाल्याच्या जवळपास ५०० हुन अधिक तक्रारी नोंद असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे महिला रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सद्यस्थितीत प्रतिदिन मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण ६५ ते ७० लाख इतकी आहे. यामध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण साधारण २० ते २२ टक्के एवढे आहे. कोरोनानंतर सर्व सुरळीत सुरु असताना प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे. याच गर्दीचा फायदा घेत उपनगरीय रेल्वे मार्गावर चोरी, दरोडेसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला महिला प्रवाशांचा विनयभंग करण्याच्या घटनाही कमालीच्या वाढल्या आहेत. रेल्वे स्थानक असो, अथवा रेल्वे डब्बा, पादचारी पूल असो अथवा रेल्वे स्थानक परिसर. या सर्वच ठिकाणी महिला प्रवाशांना विनयभंग, छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणांत काही महिला पुढे येत तक्रार नोंदवतात. तर अनेक महिला प्रवासी तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. आतापर्यंत मागील ५ वर्षात ५०० हून अधिक महिलांनी विनयभंग झाल्याच्या तक्रारी विविध रेल्वे पोलीस स्थानकात नोंदवल्या आहेत. यामध्ये काही आरोपीना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे तर काही आरोपी आजही मोकाट आहेत.

तात्काळ मदतीसाठीच्या १५१२ हेल्पलाईन क्रमांकाबाबत शंका?

कोणतीही समस्या अथवा संकट ओढवले तर महिलांना तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून १५१२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय ९५९४८९९९९१ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देखील कार्यान्वित असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात हा हेल्पलाईन क्रमांक बऱ्याचदा लागत नसल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांकडून सांगण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला हेल्पलाईन क्रमांक लागला तरी तात्काळ मदत पोहचत नसल्याचे काही महिला प्रवाशांनी सांगितले.

मागील ५ वर्षातील विनयभंग तक्रारींची आकडेवारी :

२०१७ - ९७

२०१८ - १५७

२०१९ - १५०

२०२० - ६०

२०२१ - ४०

२०२२ - ७७ (ऑगस्टपर्यंत)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in