आखातातील युद्धामुळे खत, हिरा उद्योगाला फटका

सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर ६० हजार रुपयांच्या पार गेला आहे.

मुंबर्इ: इस्त्रायल-हमास या आखातातील युद्धास आता महिना पूर्ण झाला असून अजूनही हे युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे खत आणि हिरा उद्योगाला किंचित फटका बसेल असा अंदाज भारताची पत मानांकन संस्था क्रिसिलने मंगळवारी आपल्या संशोधनात व्यक्त केला.

तसे पाहाता इस्त्रायल-हमास युद्धाचा भारताच्या व्यापारावर आतापर्यंत तरी फारच कमी परिणाम झाला आहे असे क्रिसिलने म्हटले आहे. काही उद्योग क्षेत्रे जसे खत आणि हिरा यावर मात्र किंचित पण पेलवण्याजोगा परिणाम होर्इल. इस्त्रायल व हमास यांच्यात हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर संघर्ष सुरु झाल्यानंतर सोने आणि खनिज तेल यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. खनिज तेलाच्या दरातील हालचाली भारतासारख्या देशासाठी अत्यंत महत्वाच्या असतात. कारण भारत तेलासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. तसेच खनिज तेलाचा भाव वाढला की अन्य क्षेत्रांवर देखील त्याचा परिणाम होतो. कारण इंधन तर सर्वच क्षेत्रांना हवे असते. काही कंपन्यांसाठी तर खनिज तेलच कच्चा माल असतो. भारताचा इस्त्रायलसोबतचा व्यापार खूपच अल्प आहे. २०२३ साली भारताच्या एकूण निर्यातीपैकी १.९ टक्के निर्यात आणि ०.३ टक्के आयात इस्त्रायलला झाली आहे. भारतातून इस्त्रायलला पॉलिश केलेले हिरे आणि पेट्रोलजन्य उत्पादने, निर्यात केली जातात. तर इस्त्रायलमधून भारत शुद्ध हायड्रोकार्बन, आणि किमती रत्ने, औद्योगिक उपकरणे, खते, कच्चे हिरे यांची आयात करतो. भारताच्या हिरे उद्योगासाठी इस्त्रायल हा मोठा व्यापारी देश आहे. गेल्या आर्थिक वर्षात इस्त्रायलने एकूण आयातीपैकी ५ टक्के पैलू पाडलेले हिरे भारतातून आयात केले होते. खत उद्योग क्षेत्रात इस्त्रायल हा जगातील मोठा उत्पादक देश मानला जातो. विशेषत: म्युरेट आणि पोटॅश उत्पादनात इस्त्रायल जगात मोठ्या उत्पादकात समाविष्ट आहे. तसेच ही खते ज्या तीन प्रमुख देशातून भारत आयात करतो त्यात इस्त्रायलचा समावेश आहे. हे युद्ध सुरु झाल्यापासून सोन्याच्या दरात १३ ते १५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर ६० हजार रुपयांच्या पार गेला आहे. सोन्याचा दर आणखी वाढला तर ग्राहकांची खरेदी क्षमता कमी होर्इल आणि छोटे सुवर्णकार अडचणित येतील. अशी टिप्पणी क्रिसिलने केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in