
सुमारे ९३ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पितापुत्राविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. प्रणव महेश शेठ आणि महेश शेठ अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी गुंतवणुकीच्या नावाने एका व्यावसायिकासह त्याच्या मित्रांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मितेश समीर उदेशी हे व्यावसायिक मोबाईल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची प्रणव आणि महेश यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. यावेळी या दोघांनी त्यांचा जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे तृप्ती कार नावाचे एक कार्यालय बोरिवलीतील सत्यनगर, श्रीपालनगरात असल्याचे सांगितले होते. मितेश यांनीही जुन्या कारच्या खरेदी-विक्री व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवले. स्कोडा कारच्या विक्रीतून ४० हजारांचा फायदा मिळेल, या उद्देशाने त्यांनी स्कोडा कार विकत घेतली. मात्र ती विकल्यानंतरही त्यांना कोणताही नफा या दोघांनी दिला नाही.
पैशांची मागणी केल्यानंतर ते दोघेही त्यांना शिवीगाळ करुन धमकी देत होते. या पिता-पुत्रांकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी बोरिवली पोलिसांकडे लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी ९ मे रोजी प्रणव शेठ आणि महेश शेठ या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.