अखेरीस आठ वर्षांनी अंधेरीकरांची तहान भागली; जलजोडणी दिल्याने ८५० कुटुंबांचा पाणीप्रश्न मिटला

नगरवासीयांनी पाणीपुरवठ्याच्या जोडणीसाठी पालिकेत अनेक वर्ष अर्ज करून पाठपुरावा केला होता
अखेरीस आठ वर्षांनी अंधेरीकरांची तहान भागली; जलजोडणी दिल्याने ८५० कुटुंबांचा पाणीप्रश्न मिटला

पाणी हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार असून, आठ वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता मिटला आहे. सर्वांसाठी पाणी धोरणाच्या अंमलबजावणीला वेग आला असून, अंधेरी सिद्धार्थ नगरवासीयांची आठ वर्षांनंतर पिण्याच्या पाण्याची तहान भागली असून, जल जोडणी दिल्याने ८५० कुटुंबियांचा पाणीप्रश्न मिटला आहे. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ३०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.

गेल्या अनेक वर्षांत मुंबई महापालिकेकडे ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा पद्धतीने सिद्धार्थ नगरवासीयांनी पाणीपुरवठ्याच्या जोडणीसाठी पालिकेत अनेक वर्ष अर्ज करून पाठपुरावा केला होता, परंतु स्थानिक राजकीय लोकांकडून तसेच अंधेरी पश्चिमेच्या के-वेस्ट कार्यालयाकडून या अर्जाच्या विरोधात पाणीपुरवठा जोडणी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. अनेक नियम तसेच अटी-शर्ती सांगूनही पाण्याची जोडणी टाळण्यासाठी मोठा दबावही आणला गेला, तर अनेकदा याठिकाणी जलजोडणीसाठी जलवाहिनी अस्तित्वात नसल्याचे सांगितले गेले, मात्र सर्वांसाठी पाणी योजनेमुळे मात्र या अर्जांची प्रक्रिया पुढे सरकण्यासाठी मदत झाली. महापालिकेच्या मेन्टेनन्स विभागाच्या एका शेऱ्यासाठी तब्बल ७ ते ८ महिन्यांचा कालावधी गेला, परंतु काही चांगल्या अधिकारी वर्गाने हे अर्ज मनावर घेतल्याने जोडणी देण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती पाणी हक्क समितीचे कार्यकर्ते प्रवीण बोरकर यांनी दिली.

पाणी माफियांच्या दहशतीला आळा बसणार

पालिकेच्या पाण्याचा वापर हा पाणी माफियांकडून करतानाच हे पाणी चढ्या दराने विकण्याचे प्रकार याठिकाणी घडत होते. आता अधिकृतरीत्या पाणी उपलब्ध होणार असल्यानेच पाणी माफियांच्या दहशतीला आळा बसेल, असे बोरकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in