आता घरबसल्या शोधा आपले आवडते गणेश मंडळ ; विसर्जनस्थळाची माहिती एका क्लिकवर

बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि संकेतस्थळाची सुविधा यंदा मुंबई महापालिकेने उपलब्ध केली आहे.
आता घरबसल्या शोधा आपले आवडते गणेश मंडळ ; विसर्जनस्थळाची माहिती एका क्लिकवर

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. मुंबईसह देशभरातील पर्यटक गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन, सजावट, देखावे पाहण्यासाठी येत असतात. आवडते गणेश मंडळ, घराजवळ विसर्जनस्थळ कुठे, याची माहिती पर्यटकांसह भक्तांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि संकेतस्थळाची सुविधा यंदा मुंबई महापालिकेने उपलब्ध केली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याआधी घराजवळील विसर्जनस्थळ आणि वेळ याची नोंद करण्याची सुविधा केल्याने आता घरबसल्या गणेशमूर्ती विसर्जनस्थळाची माहिती उपलब्ध होणार आहे.

मुंबईतील गणेशोत्सव हा मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. गणेशोत्सवाचा आनंद घेणे नागरिकांना व पर्यटकांना अधिक सोपे व्हावे, यासाठी त्यांना आपल्या नजिकचे गणेश मंडळ शोधता यावे, तेथपर्यंत पोहोचणे सोपे व्हावे, यासाठी महानगरपालिकेने व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि संकेतस्थळ या दोन्ही ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आधारित पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी दिले होते. त्यानुसार गणेशभक्तांना आता आपल्या जवळचे व आवडीचे गणेश मंडळ, त्याचप्रमाणे भाविकांना विसर्जन स्थळांची माहिती मिळवणे, विसर्जनाचे ठिकाण व वेळ यांची ऑनलाईन नोंद करणे, इत्यादी सुविधा अत्यंत सुलभरित्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपआयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार आणि संचालक (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे यांनी दिली आहे.

एका क्लिकवर मिळणार माहिती!

महानगरपालिकेची मायबीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट ही भ्रमणध्वनी आधारित सेवा ८९९९२२८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे. चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी, या चॅटबॉट क्रमांकावर जाऊन पर्यटक हा पर्याय निवडावा. त्यानंतर मुख्य सूची (लिस्ट) या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर, माझ्या जवळच्या सुविधा यामध्ये क्लिक केल्यास गणपती मंडळ तसेच गणपती विसर्जन असे दोन पर्याय दिसतात.

घर बसल्या वेळ व ठिकाण नोंदणी करा!

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने आपल्या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन, वेळ, नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा विकसित केली आहे. गणेशोत्सव मंडळ अथवा भाविकांनी संकेतस्थळावर 'नागरिकांकरीता' या सदरामध्ये जावून 'श्री गणेश मूर्ती विसर्जनाचे स्लॉट बुकींग' हा पर्याय निवडावा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in