मुंबई : रॉबरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील पाच आरोपींना गोरेगाव आणि दहिसर येथून एमएचबी व वनराई पोलिसांनी अटक केली. मोहम्मद आजम अब्दुल रशीद अन्सारी, सादिक खुर्शिद शेख, प्रेम खुशाल सोलंकी, शाहिद शौकतअली शेख आणि ओमकार राजू गौड अशी या पाच जणांची नावे असून अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथील नेस्को कंपनीजवळ काही सराईत गुन्हेगार रॉबरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून गस्त सुरु केली होती. सोमवारी रात्री तिथे मोहम्मद आजम आणि सादिक शेख हे आले होते. यावेळी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. चौकशीत ते दोघेही रेकार्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, वडाळा रेल्वे, टिळकनगर, पंतनगर, मुंब्रा, दिडोंशी, कुरार पोलीस ठाण्यात प्रत्येकी बारा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.