
सांताक्रुझ : दत्तमंदिर रोड येथे राहणारी १२ ते १५ वयोगटातील पाच मुले जुहू चौपाटीवर पावसाचा आनंद घेण्यासाठी गेले. समुद्रात खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन त्याठिकाणी उपस्थित लाईफ गार्डनी केले; मात्र लाईफ गार्ड व पोलिसांना चकवा देत ही मुले खोल पाण्यात गेली आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मुले बुडाली. तेथे उपस्थितांना घटना कळताच बचावकार्यासाठी पुढे आले पण दोघांना वाचवले आणि तिघांना जीव गमवावा लागला. वांद्रे येथील बॅड स्टॅड वर २७ वर्षीय मुलीला हटकूनही ती समुद्रात असलेल्या दगडांवर बसली आणि उंच लाट आली.. मुलीला घेऊन गेली. त्या तरुण मुलीने तेथील लोकांचे ऐकले असते, तर आज जगली असती. एकूणच घटना कुठलीही असो त्यात जीव जाण्याची घटना घडते म्हणजे त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असणार किंवा संबंधित यंत्रणा. पावसाळा वगळता समुद्र किनारी, चौपाट्यांवर पर्यटक येत असले, तरी समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे अशा घटना पावसाळ्यात घडतात. पावसाळ्यात समुद्र किनारी चौपाट्यांवर जाऊ नये अशी सूचना पालक वर्गाने करणे गरजेचे आहे. आपला मुलगा कुठे फिरायला जातो, याची तसदी घेण्याची वेळ सध्या पालकवर्गाकडे नाही. त्यामुळे समुद्रात खोल पाण्यात जाऊ बुडणारा पर्यटक हा बेपर्वाईचा बळी असतो.
आग लागणे, झाड कोसळणे, पूल कोसळणे, रस्ता खचणे अशा प्रकारच्या घटना मुंबईसाठी नवीन नाहीत. परंतु गेल्या काही वर्षांत समुद्रकिनारी चौपाट्यांवर अतिउत्साही पर्यटकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी चौपाट्यांवर सुरक्षेचे योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. मुंबईचा विकास होत असताना पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पर्यटनस्थळांचा कायापालट केला जात आहे. चौपाटी व समुद्र किनारी पर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबईतील विविध चौपाट्यांवर 'टेहाळणी मनोरे' उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे; मात्र पालिकेच्या या योजनेस राज्य सरकारच्या कोस्टल अॅथोरिटी विभागाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणारे टेहळणी मनोरे राज्य सरकारच्या लालफितीत अडकल्याने पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, 'टेहाळणी मनोरे' उभारणीसाठी मुंबई अग्निशमन दलाने चौपाटी असलेल्या वॉर्डासाठी दिलेला २० लाखांचा निधी पडून आहे. समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'टेहाळणी मनोरे' उभारल्यास अतिउत्साही पर्यटकांवर नजर ठेवणे शक्य होईल आणि दुर्घटना टाळणे शक्य होईल, या उद्देशाने मनोरे उभारण्याचा प्रस्ताव तयार करुन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी न दिल्याने मनोरे उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे रखडला यात दुमत नाही.
झाड व झाडाची फांदी कोसळणे, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे, आग लागणे, रस्ता खचणे या गोष्टी मुंबईकरांच्या जीवनात नेहमीच दुख:द अनुभव घेऊन येतात. या घटनांमुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झालेत. पावसाळ्यात समुद्रकिनारी चौपाट्यांवर पावसाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या जीवावर बेतले, असे प्रकार उघडकीस आले आहेत. चौपाटीवर एखाद्याचा जीव गेला आणि त्यावर राजकीय पोळी भाजून घेणे हेच नेते मंडळी संधी सोडत नाहीत. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, आतापर्यंत घडलेल्या घटनांचा जाब विरोधक विचारणार. परंतु ठोस उपाययोजना करण्याबाबत कोणी पुढाकार घेणार नाही. करदात्या मुंबईकरांमुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षांला कोट्यवधींचा महसूल जमा होत असल्याने आर्थिक गाडा हाकणाऱ्या मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी मुंबईकरांच्या जीवाची पर्वा आता तरी करणार का? असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.