
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्यांच्याकडे ३३ वर्षांपासून असलेला महाराष्ट्र सरकारचा एक भूखंड परत केला आहे. मुंबईतील वांद्रे या भागात क्रिकेट अकॅडमी सुरू करण्यासाठी ही जमीन गावस्कर यांना देण्यात आली होती. मात्र तब्बल ३३ वर्षांपासून ही जमीन ओस पडल्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर गावस्कर यांनी ही जमीन परत केली आहे.
सुनील गावस्कर यांनी क्रिकेट अकॅडमी सुरू करण्यासाठी मुंबईमध्ये जागा देण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ३३ वर्षांपूर्वी गावस्कर यांना म्हाडातर्फे वांद्रे येथे एक प्लॉट दिला होता. मात्र ३३ वर्षांनंतरही अकादमीची एकही वीट रचली न गेल्याने काही दिवसांपूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. तीन दशकानंतरही वापर न झाल्यामुळे ओस पडलेला हा प्लॉट परत करण्याची विनंती आव्हाड यांनी गावस्कर यांना केली होती.
महाराष्ट्र सरकार आणि गावस्कर यांच्यात याप्रकरणी जवळपास आठ महिन्यांपासून चर्चा होत होती. शेवटी पूर्ण विचारविनिमय करून गावस्कर यांनी हा भूखंड म्हाडाला परत दिला आहे. त्याचबरोबर गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असून या पत्रात क्रिकेट अकॅडमी स्थापन करू न शकल्याची खंत गावस्कर यांनी व्यक्त केल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.