माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांचा शिंदे गटात प्रवेश

उद्धव ठाकरे यांनी त्यांना नामनिर्देशित नगरसेविका म्हणून आणखीन एक संधी पालिकेत उपलब्ध करून दिली
माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांचा शिंदे गटात प्रवेश
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली आहे. ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तसेच माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे पक्षात प्रवेश केल्याने ठाकरेंसाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार आणि शिवसेना सचिव मनीषा कायंदे, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी नगरसेवक परमेश्वर कदम, सुवर्ण करंजे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून मूळ शिवसेनेत दोन गट पडले असून उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट अशी गटबाजी सुरू झाली. तेव्हापासून ठाकरे गटातील नाराज खासदार, आमदार व नगरसेवकांचे इनकमिंग शिंदे यांच्या शिवसेनेत होत आहे.

तृष्णा विश्वासराव यांनी २०१२ च्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलग दोन वर्षे सभागृह नेतेपद दिले होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते नियाज वणू यांचे चिरंजीव सुफीयांन वणू यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत तृष्णा विश्वासराव यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यांना नामनिर्देशित नगरसेविका म्हणून आणखीन एक संधी पालिकेत उपलब्ध करून दिली. मात्र ठाकरे गटाची सत्ता हातातून गेल्यावर पक्षाला उतरती कळा लागली. तृष्णा विश्वासराव या सध्या काहीशा नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी पुढील राजकीय कारकीर्द टिकवण्यासाठी धाडसी निर्णय घेत मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे पक्षाच्या शिवसेनेत प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in