
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या अर्जाचा फैसला लांबणीवर पडला आहे. आज मंगळवारी निर्णय अपेक्षित होता; मात्र तो लिहून पूर्ण न झाल्याने विशेष न्यायालयाने आपला निर्णय १३ मे रोजी देण्याचे निश्चित केले आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ‘ईडी’ने मनीलाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. २१ एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून त्यानंतर १२ तास चौकशी केल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी ‘ईडी’ने अनिल देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुखांनी सत्र न्यायालयात नव्याने अर्ज दाखल केला आहे. आपल्याला अनेक शारीरिक आजार आहेत. तसेच सरकारी जेजे रुग्णालयात उपचाराच्या सोयी-सुविधांचा अभाव आहे. अपुर्या सुविधामुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे.
त्यावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. जे.जे या सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रकिया करण्याची परवानगी द्या, अशी विनंती केली. याला ‘ईडी’ने जोरदार विरोध केला जे. जे. रुग्णालयात अद्ययावत सुविधा असल्याने खासगी रुग्णालात उपचार करण्याची गरज नसल्याचा दावा ‘ईडी’ने केला. तर देशमुख यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याची गरज नसल्याचा अहवाल जे.जे.तील डॉक्टरांनी सादर केला आहे. न्यायालयाने याची दखल घेत निर्णय राखून ठेवत जो मंगळवारी देण्याचे जाहीर केले होते; मात्र आज निर्णय होऊ शकला नसल्याने न्यायालयाने तो १३ मे रोजी देण्याचे निश्चित केले आहे