माजी मंत्री सदाभाऊ खोत व भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी केले केतकी चितळेचे समर्थन

माजी मंत्री सदाभाऊ खोत व भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी केले केतकी चितळेचे समर्थन

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत व भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेचे समर्थन केले आहे. दरम्यान, राज्यभरात केतकी चितळेविरुद्ध १५ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘केतकी चितळेचा मला अभिमान वाटतो. ती कणखर आहे, तिला समर्थनाची गरज नाही आणि तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू स्वत: मांडली’, अशा शब्दांत आमदार सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच कौतुक केले आहे.

राष्ट्रवादीकडून विश्रामगृहात

घुसून सदाभाऊंचा निषेध

सोलापुरात शासकीय विश्रामगृहात सदाभाऊ खोत हे सोमवारी दुपारी आले असता त्यांच्या दालनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग घेऊन घुसले आणि ‘सदाभाऊ खोत यांना पांडुरंगाने सद्बुध्दी द्यावी’ म्हणून प्रार्थनावजा घोषणा देऊ लागले. नंतर या कार्यकर्त्यांनी खोत यांना जाब विचारत गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावेळी खोत हे खुर्चीवर शांतपणे बसून या रोषाला सामारे जात होते. अखेर तेथे धावून आलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या आंदोलक कार्यकर्त्यांना दालनातून बाहेर काढले.

दरम्यान, भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनीही केतकीचे समर्थन केले असून केतकीच्या पोस्टमध्ये थेट कुणाचे नाव घेण्यात आलेले नाही, असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करा, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘केतकी चितळेने जी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यामध्ये पवार असा उल्लेख होता. शरद पवार असे पूर्ण नाव लिहिलेले नाही. त्यामुळे ती नेमकं शरद पवारांबद्दलच बोलली का, या मुद्यावर कदाचित न्यायालयामध्ये ही केस टिकू शकणार नाही,’ असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

केतकीच्या घरातून लॅपटॉपसह

संशयास्पद वस्तू जप्त

ठाणे पोलिसांनी सोमवारी केतकी चितळेच्या नवी मुंबईमधील घरी जाऊन तपास केला व तिच्या घरातून लॅपटॉप, डेस्कटॉप कंप्युटरसहित काही संशयास्पद वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in