
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदी अरेबिया, दोहा आणि लंडनला जाण्यासाठी आलेल्या चार प्रवाशांना सहार पोलिसांनी अटक केली. चुकीची माहितीसह बोगस दस्तावेज सादर करून मिळविलेल्या भारतीय पासपोर्टवर त्यांचा विदेशात जाण्याचा प्रयत्न होता; मात्र त्यांचा हा प्रयत्न इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. सुनिलकुमार श्रीप्रसाद गुप्ता, मोहम्मद आलमगीर शेख, अफजल फिरोज खान, ऋत्वीक संजयभाई सोराठी अशी या चौघांची नावे असून, अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. २०१८ साली उत्तरप्रदेशातील लखनऊ पासपोर्ट कार्यालयात बोगस दस्तावेज सादर करून भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर त्याने दोन वेळा विदेशात प्रवास केला होता. तिसऱ्यांदा तो मुंबईहून दोहा येथे जाण्यासाठी आला होता. यावेळी त्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याच्या बोगस भारतीय पासपोर्टचा पर्दाफाश करून त्याला सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसर्या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद आलमगीर आणि अफजल खान या दोन प्रवाशांना अटक केली. ते दोघेही मूळचे कोलकाताच्या मुर्शिदाबादचे रहिवाशी आहेत. त्याने त्यांच्या जन्मतारखेत बदल करुन चुकीची माहिती सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर ते दोघेही सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते, मात्र या दोघांनी बोगस पासपोर्टवर विदेशात जाण्याचा प्रयत्न केल्याचे उघड होताच त्यांना सहार पोलिसांनी अटक केली. तिसर्या कारवाईत पोलिसांनी ऋत्वीक सोराठी या गुजरातच्या वलसाडचा रहिवाशी असलेल्या प्रवाशाला अटक केली. त्याने सुरत पासपोर्ट कार्यालयात खोटी माहिती देऊन भारतीय मिळविल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच पासपोर्टवर तो लंडनला जाण्यासाठी विमानतळावर आला होता. अटक केलेल्या चारही प्रवाशांना नंतर भादवीच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.