
मुंबई : पार्टटाईम जॉंबच्या नावाने विविध टास्कद्वारे अनेकांची ऑनलाईन फसवणूक करणार्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या टोळीशी संबंधित चार रेकॉर्डवरील सायबर ठगांना पुणे, अहमदनगर आणि हरियाणा येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुलदिप सज्जनकुमार, विशाल लक्ष्मण मोहिते, शुभम भाऊसाहेब लोखंडे आणि आकाश विठोबा मुजमुले अशी या तिघांची नावे आहेत. यातील कुलदिप हा हरियाणा, तर इतर तिघेही पुणे व अहमनगरचे रहिवाशी असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले.
आरोपींकडून पोलिसांनी साडेतीन लाखांची कॅश, आठ मोबाईल जप्त केले असून ९ लाख २७ हजाराची कॅश बँक खात्यात फ्रिज केली आहे. यातील तक्रारदार यांना काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन रेटींग टास्कचे काम दिले होते. गुगल मॅपवर हॉटेलला रेटींग दिल्यानंतर त्यांना चांगले कमिशन मिळेल असे सांगून त्यांना विविध टास्कसाठी पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी विविध टास्कसाठी ९ लाख ६८ हजाराची गुंतवणूक केली होती.